नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या  शिर्षकाअंतर्गत ‘बियाणे’ या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  या सुविधेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांनी 15 मे 2021 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्यादृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींसाठी अर्ज करावयाचा आहे.

महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना’  हा पर्याय निवडावा.  शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईल, संगणक, लॅपटॅाप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करावा. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.

आधार क्रमांक नसल्यास प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद केल्यास योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

या कामासाठी आपल्या जवळच्या सामुहिक सेवा केंद्राची मदत घ्यावी. यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास [email protected] या ईमेल पत्त्यावर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.