नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या बालशक्ती व बाल कल्याण पुरस्कार 2021 साठी 15 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावयाचे आहे.

 बालशक्ती पुरस्कार पाच पेक्षा अधिक व 18 वर्षांपर्यंत वयाच्या आणि शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नावीण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य, शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेल्या मुलांना दिला जातो.

बालकल्याण पुरस्कार हा मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी भावनेतून किमान सात वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. तसेच बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला देखील हा पुरस्कार दिला जातो. ही संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान दहा वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी. बालशक्ती पुरस्कार 2021 व बाल कल्याण पुरस्कार 2021 पुरस्कारासाठी www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सु.शं.इंगवले यांनी केले आहे.