नंदुरबार/प्रतिनिधी-
बस थांबा असतांनाही त्याठिकाणी बस न थांबली नसल्याचा राग आल्याने तिघांनी बसवर दगडफेक केली. यात बसच्या काचा फुटून बसमधील चार प्रवासी विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत.
शहादा येथील आगारातील बसचालक किशोरकुमार वामनराव ठाकूर हे एसटी बस (क्रं.एम.एच.14-बीटी.1868) विद्यार्थी व प्रवासी बसवून कलमाडी ते शहाद्याकडे येत होते. परंतू, बस ही ठरल्या ठिकाणी न थांबल्याचा राग येवून संशयित तिघांनी बसवर दगड मारुन प्रवाश्यांच्या जिवीतास धोका निर्माण होईल, असे कृत्य केले. या दगडफेकीत बसच्या पाठीमागील काचा फुटून बसमध्ये बसलेल्या अंजी आसाराम कोळी, वैशाली जागो कोळी, गायत्री मनोहर पाटील, सेजल युवराज पाटील (सर्व.सोनवल ता.शहादा) हे चौघेही जखमी झाले आहेत. याबाबत बसचालक किशोरकुमार ठाकूर यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश गोपाळ कोळी, गणेश राजू धनगर (रा.कलमाडी) व त्यांचा अन्य जण या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना.संदीप लांडगे करीत आहेत.