तीन वेळा महाराष्ट्र केसरी खिताब पटकावून इतिहास निर्माण करणारे प्रसिद्ध मल्ल व आता पोलीस खात्यात पोलीस उपअधीक्षक पदावर  नियुक्त झालेले श्री विजय नत्थु चौधरी यांची नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे उपविभागीय  पोलीस अधीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यातील तब्बल 102 पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आज निर्गमित करण्यात आले.सध्या पुणे ग्रामीण पोलीस विभागात कार्यरत असलेले परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री विजय चौधरी हे तीन वेळा महाराष्ट्र केसरी खिताब पटकवणारे प्रसिद्ध मल्ल आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहर जातीय तणावामुळे बदनाम होते, त्यात काही वर्षांपासून दोनही समाजातील वरिष्ठांनी समोपचाराची भूमिका घेऊन शहर व तालुक्यात शांतता निर्माण केली आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच किरकोळ कारणावरून वाद उसळून येथील शांतता भंग झाली होती. या पार्श्वभूमीवर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री विजय चौधरी यांच्या अक्कलकुवा येथील नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.