नंदुरबार (प्रतिनिधी) – भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तृप्ती धोडमिसे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत. त्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१९ बॅचच्या अधिकारी असून परीक्षेत भारतात १६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

मूळच्या पुणे येथील असलेल्या श्रीमती धोडमिसे पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील बी.टेक.झाल्या असून यापूर्वी त्यांनी एल अँड टी मध्ये इंजिनिअर आणि महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात सहायक आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय प्रबोधिनीतुन त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. नंदुरबार आकांक्षीत जिल्हा असल्याने काम करण्याची चांगली संधी आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अनुभव पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असे श्रीमती धोडमिसे यांनी म्हटले आहे.