नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 2021 रोजीचा 65 व्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम कोविडच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे असे आवाहन जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

            यावर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 2021 रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा  कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पद्धतीने  व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावा. महापरिनिर्वाण दिन हा दिवस भारतीयांसाठी दु:खाचा, गांभिर्याने पालन करावयाचा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.  त्यामुळे कोविड संसर्गचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांर्भीयाने वागावे.  शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी दादर येथे न जाता घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.

 चैत्यभूमी, दादर मुंबई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पुर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. तसेच औष्णिक पटेक्षमच्या तपासणीअंती ज्याचे शरीराचे तापमान सर्वसाधारण असेल त्यानाच कार्यक्रमास उपस्थित राहण्यास परवानगी असेल. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा,सॅनिटायझरचा आणि सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक असेल.

कोविड-19 व विशेषत्वाने ‘ओमिक्रॉन’ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनाचे व नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष महापरिनिर्वाण दिन अभिवादन सुरु होण्याआधी नवीन काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 , साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.