नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्ह्यात मिशन झिरो ड्रॉप आउट या शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमेमध्ये सर्व अंगणवाडी सेविका, शिक्षक, स्थानिक बालरक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच सर्व राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी केले.

 महाराष्ट्र शासनाच्या 23 जून 2022 च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण जिल्हाभरात दिनांक 5 ते 20 जुलै 2022 या कालावधीत ‘मिशन झिरो ड्रॉप आउट’ ही शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक गाव स्तरावरील अंगणवाडी सेविका, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक व स्थानिक बालरक्षक या शोध मोहिमेत सहभागी होणार आहेत. यादरम्यान 3 ते 18 वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यात येणार असून, एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या मोहिमेत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, तालुका स्तरावर तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष असणार आहेत. शोध मोहिमेत शिक्षण विभागातील संपूर्ण यंत्रणा कार्यरत राहणार असून, सर्व पालकांनी या मोहिमेस सहकार्य करून मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे 

दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील मिशन झितो ड्रॉपआऊट या शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा पत्री यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ गावडे, जिल्हा शिक्षक व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री जे ओ भटकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री सतीश चौधरी, महिला व बालविकास अधिकारी श्री. कृष्णा राठोड, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. संदीप मुळे, विषय सहाय्यक श्री देवेंद्र बोरसे,  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री गौतन वाघ, समता विभागाचे श्री महेंद्र अहिरे, श्री राजेश चव्हाण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी श्री निर्मल माळी, जिल्हा बालकामगार अधिकारी कार्यालयाचे श्री. शेळके जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी श्री. सोनवणे यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.  या बैठकीत जिल्ह्यात राबवावयच्या मिशन झिरो ड्रॉप आउट या मोहिमेंतर्गत कोणकोणत्या ठिकाणी सर्वेक्षण करावे याबरोबरच सर्वेक्षणात कोणकोणत्या यंत्रणेने कोणकोणती जबाबदारी पार पाडावी, याविषयी चर्चा करून केंद्र, तालुका व जिल्हा पातळीवरील विविध समित्यांची रचना करून जबाबदारी वाटप करण्यात आल्या.   

सुरुवातीला प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी श्री सतीश चौधरी यांनी २३ जूनच्या शासन परिपत्रकाचे वाचन करून मोहिमेबाबत माहिती दिली. 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जे. ओ. भटकर यांनी मोहिम राबविताना ग्राम पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंतच्या सर्व यंत्रणेने आपण करत असलेल्या कामाला व्यापक प्रसिद्धी देण्याचे आवाहन करत गावात प्रत्येक नागरिकाला या मोहिमेची माहिती मिळण्यासाठी दवंडी व इतर तत्सम माध्यमांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. 

महिला व बालविकास विभागाचे अधिकारी श्री  कृष्णा राठोड यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक या मोहिमेत सहभागी होऊन शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यासाठी व मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील, अशी माहिती दिली.

तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी प्रत्येक तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक तसेच गाव पातळीवरील बालरक्षकांकडून मोहिमेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी व ही मोहीम 100% यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या. 

तसेच जिल्ह्यातील शंभर टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देऊन एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी मिशन झिरो ड्रॉप आउट ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन करत, यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधिनी सजकार्य करावे असे आवाहन करत महसूल व शिक्षण विभागातील यंत्रणेला वाटून दिलेले काम जबाबदारीने पार पाडले पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी अध्यक्षीय समारोप करताना दिल्या.