नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्हा महिला व बाल विकास विभाग नंदुरबार अंतर्गत जिल्हा बाल कक्षाच्या मार्फत चौपाळे येथे गाव बाल संरक्षण समितीची कार्यशाळा संपन्न झाली.

बाल कल्याण समितीचे अध्यक्ष विठ्ठल कदम यांनी बालकांचे हक्क, अधिकार आणि बालकांसंदर्भातील विविध कायदे पालकांनी मुलांसाबत वागतांना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गौतम वाघ यांनी गाव बाल संरक्षण समितीची गरज, कार्यप्रणाली व भूमिका तसेच बालविवाह, स्थलांतर, शिक्षणाचा हक्क आणि एकदंरीत मुलांच्या समस्यांबाबत गाव बाल संरक्षण समितीची कार्य, भूमिका आणि अहवालाबाबत माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक महसूली गावात बाल संरक्षण समिती स्थापन करण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षणाच्या वतीने करण्यात आले.

या कार्यशाळेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजित इंगवले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, बाल संरक्षण अधिकारी रेणुका मोघे, समुपदेशक गौरव पाटील, अंगणवाडी सेविका रत्ना पवार, अल्का माळी, अरुणा राठोड हे उपस्थित होते.