नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यात उपचारानंतर  कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून त्याचे प्रमाण 68 टक्के झाले आहे. आतापर्यंत 364 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  जिल्ह्यात 30 जुलै रोजी दुपारपर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तिंची एकूण संख्या 535 आहे. त्यापैकी उपचारानंतर 364 घरी परतले आहेत. 130 रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालय येथील कोविड हॉस्पिटल, शहादा येथील कोविड केअर सेंटर व एकलव्य स्कूल येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.

आजाराची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय व सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोविड केअर सेंटर येथे व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 14 वैद्यकीय अधिकारी, 33 परिचारिका, 2 इतर अधिकारी आणि 20 इतर कर्मचारी रुग्णांना 24 तास सेवा देत आहेत. काही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संसर्ग होवूनही रुग्णसेवेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. बरे होणाऱ्या रुग्णांनी उत्स्फुर्तपणे  संकटाच्या परिस्थितीत सेवा देणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबद्दल आदराची भावना व्यक्त केली आहे.         

            जिल्हा प्रशासनातर्फे रुग्णालयात सर्व प्रकारची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या आहारावरही विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्यादृष्टीने त्यांना उपचार व आहार देण्यात येत आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. रक्तदाब, मधुमेह आदी आजार असणारे आणि वृद्ध रुग्णदेखील वेळीच तपासणी झाल्याने बरे झाले आहेत.

            जिल्हा शासकीय रुग्णालयात 38 व्हेंटीलेटर्स व 30 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. येत्या आठवड्यात त्यात आणखी 135 ऑक्सिजन बेड्सची भर पडणार आहे. शिवाय कोरोनावर उपचारासाठी आवश्यक इंजेक्शन अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी शासन स्तरावरदेखील प्रयत्न करीत आहेत.

            वेळेवर आजाराचे निदान झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणखी वाढू शकेल. त्यामुळे शहरी भागात मोबाईल स्वॅब टेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांनी ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. आजार उपचारानंतर बरा होत असल्याने न घाबरता तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.