नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आळींबी प्रक्रिया उद्योग इतर शेतकऱ्यांस  निश्चित प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

एकात्मीक फलोत्पादन अभियान अंतर्गत शहादा तालुक्यातील कहाटूळ येथे घनश्याम रतिलाल पाटील यांच्या आळींबी उत्पादन केंद्राच्या पाहणी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मंजुळा गावीत,उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार उल्हास देवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, उप विभागीय कृषी अधिकारी व्ही.बी.जोशी, तालुका कृषी अधिकारी किशोर हाळपे आदी उपस्थित होते.

श्री.भुसे म्हणाले, हा प्रकल्प नाविन्यपूर्ण असून भविष्यकाळाचा वेध घेणारा आहे. अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने मशरुम निर्मिती या ठिकाणी केली जात असून ते विक्रीसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे जाणे ही जिल्ह्यासाठीदेखील चांगली बाब आहे.  आळींबी उत्पादनाचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इतर शेतकऱ्यांनी असे प्रकल्प सुरु केल्यास कृषी विभागामार्फत योग्य ते सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कृषी विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत श्री.भुसे यांच्या हस्ते आंबा वृक्षाचे लागवड करुन फळबाग लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.

मौजे.शिंदे ता.नंदुरबार येथील फळबाग लागवडीस भेट

श्री.भुसे यांनी नंदुरबार तालुक्यातील मौजे शिंदे येथे विधी विजय पाटील यांच्या  रोजगार हमी योजनेशी निगडीत लिंबू फळबाग लागवडीस भेट दिली. त्यांच्या बागेची पाहणी करुन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.